Header & Footer Wide Ads

अशोका शाळेची राष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी

नाशिक- येथील अशोका युनिव्हर्सल शाळेच्या संगीत विभागाने राष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध करीत उत्तुंग भरारी घेतली आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या समुहगान स्पर्धेत अशोकाच्या विद्यार्थ्यांनी लोकगीतात प्रथम,  संस्कृत गीतात द्वितीय क्रमांकाचे  पारितोषिक मिळवून नाशिक आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत कुठल्याही गीत प्रकारात नाशिक आणि महाराष्ट्राने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेणे ही विशेष बाब या निमित्ताने घडली. नाशिककरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे की अशोका मार्ग येथील अशोकाच्या विद्यार्थ्यांनी गेल्या पंचवीस वर्षानंतर नाशिकने मिळवला आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे काम करणाऱ्या काही मोजक्या संस्थांमध्ये भारत विकास परिषद ही संस्था आज स्वतःचे नावलौकिक मिळवून आहे.प्राचीन भारतीय तत्वाची संपर्क,  सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पाच ध्येयपूर्ण प्रेरक तत्व गुण शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी भारत विकास परिषद दरवर्षी राष्ट्रीय समूहगान स्पर्धा आयोजित करते. ही स्पर्धा चार स्तरावर घेतली जाते. शाखा स्तर, प्रांत स्तर, विभागीय स्तर आणि राष्ट्रीय स्तर. दरवर्षी सबंध भारतातून 5000 शाळेतील लाखो विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतात. उत्तम आयोजन आणि कल्पक नियमांमुळे ही स्पर्धा भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते.


स्पर्धेत यावर्षी अशोका युनिव्हर्सल शाळेच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादित केले आहेत. नाशिक येथील भारत विकास परिषदेच्या मिड-टाऊन शाखेतर्फे झालेल्या प्रारंभिक फेरीत विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यात देशभक्‍तीवर संस्कृत आणि हिंदी गीत यात शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट संघाचे विजेतेपद मिळाले. 


पुढे पुण्याला होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत स्तरावरच्या फेरीसाठी आपल्या अशोकाच्या संघाने पात्रता मिळविली. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या तेरा संघासोबत झालेल्या चुरशीच्या फेरीमध्ये  संस्कृत गीत आणि हिंदी गीत  त्यात अनुक्रमे प्रथम क्रमांक  मिळवला आणि त्याही फेरीत सर्वोत्कृष्ट संघाचे विजेतेपद  मिळवून पुढील विभागीय स्तरावर सहभागासाठी अशोकाचा विद्यार्थ्यांनी त्यांचे स्थान पक्के केले.


विजयाच्या नवीन उर्जेने विभागीय स्तरावर संघ अहमदाबाद येथे दाखल झाला गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातून एकूण नऊ विजयी संघ या फेरीत सहभागी होते. या फेरीतही संस्कृत गीत, हिंदी गीत याशिवाय नव्याने लोकगीते सादर करावयाचे होते. याही फेरीत  संस्कृत गीत आणि हिंदी गीत  त्यात अनुक्रमे प्रथम क्रमांक आणि लोकगीतात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संघाने स्पर्धेतील  सर्वोत्कृष्ट संघाचे विजेतेपद  पुन्हा मिळवले.


संघ पुढील अंतिम फेरीसाठी पात्र झाला. अंतिम फेरी राजकोट येथे आयोजित केली होती. अंतिम फेरीसाठी भारताच्या पूर्व-पश्चिम-उत्तर- दक्षिण-मध्य विभागातील उत्कृष्ट नऊ विजय संघांच्या 72 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. अत्यंत अटीतटीच्या या फेरीत अशोकाच्या विद्यार्थ्यांनी  लोकगीतात प्रथम, संस्कृत गीतात द्वितीय क्रमांकाचे* पारितोषिक मिळवले. *नऊ संघांपैकी फक्त तीनच संघ अशी उज्वल कामगिरी करु शकलेत. त्यात अशोकाच्या या संघाचा समावेश आहे.


संघाची उत्कृष्ट स्वररचना, प्रभावी सादरीकरण, आकर्षक वेशभूषा,  उत्तम साथ-संगत यातून सन्माननीय परीक्षक आणि उपस्थित रसिकांची दाद त्यांना मिळाली. त्यांच्या या यशाबद्दल नाशिक संगीत क्षेत्रातल्या नामवंतांनी कौतुकाची थाप दिली आहे.
अशोकाच्या या संघात अमोघी कुलकर्णी, शयन पटेम, मेघराज आहेर,  ब्रजदेवी खेडकर, प्रिया भट, सृजन  पाटील, शुभांगी दंताळे, सिद्धी कांकरिया, परीक्षित मिसाळ हे विद्यार्थी सहभागी होते.


याशिवाय शाळेच्या माजी विद्यार्थिनी मैथिली चौधरी, तन्मयी घाडगे आणि निमिष घोलप  यांचे विशेष सहकार्य लाभले 


शाळेच्या कला विभागातील शिक्षकांसोबतच संगीत विभागाच्या शिक्षिका जागृती नागरे, जोशवा पाथरे,  आदित्य कुलकर्णी आणि विभागप्रमुख ज्ञानेश्वर कासार यांचे विशेष  मार्गदर्शन लाभले अशोका युनिव्हर्सल शाळेच्या संगीत विभागाच्या या स्पृहणीय या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक कटारिया,  विश्वस्त सौ.आस्था कटारिया, सहसचिव श्री श्रीकांत शुक्ल, प्राचार्य अमिताभ वर्ग, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्री.उमेश राठी,  शाखाध्यक्ष श्री.प्रदीप बत्रा, शाखा सचिव श्री.अजित जैन संयोजिका सौ.हर्षा वैद्य व इतर पदाधिकारी शिक्षक व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.