Header & Footer Wide Ads

स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक वैशिष्ट्यपूर्णरित्या उभारावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद: निसर्गाला पूरक असे वैविध्य जपत व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज श्री. ठाकरे यांनी केली.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या निलगिरी, शिवबाभूळ आदी वृक्षांमध्ये वाढ करून इतर वन्यजीवांना आवश्यक असलेल्या वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. यामध्ये विविध पक्षांचा अधिवास वाढेल याचा विचार व्हावा. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारकाची उभारणी करण्यावर भर द्यावा, असेही श्री.ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेय, वास्तूविशारद धीरज देशमुख, श्री. दवे यांनी स्मारकाच्या नियोजित आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.