Header & Footer Wide Ads

लाचखोरीचे पोलिसिंग…

संतोष लोळगे 
हर व ग्रामीण पोलिस दलातील पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी २४ तासांच्या अवधीत लाच घेताना रंगेहाथ पकडले जाण्याची घटना नाशिकच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. ज्या पोलिस ठाण्यात बसून हद्दीचे पोलिसिंग करायचे तिथे लाचखोरीचे पोलिसिंग सुरु असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. यामुळे शहर व ग्रामीण दलाच्या कार्यपद्धतीविरुद्ध आता नाशिककरांमध्ये चर्चा होत आहे. 

ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सीबीएस परिसरात वास्तव्यस असतात. त्याला लागूनच तालुका पोलिस ठाणे आहे. गुरूवारी २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब रामकिशन नागदरे तसेच सहायक उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे  यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सुला वाईन्स येथे होणाऱ्या म्युझिक इव्हेंटसाठी साउंड सिस्टीमची परवानगी देण्यासाठी हे पैसे मागितले जात होते. विशेष म्हणजे आयोजकांनी यापूर्वीही या महाशयांना पैसे दिले होते. पंजाबी गायक रफ्तार याचा हा शो यापूर्वीच आयोजित केला होता. मात्र अवकाळी पावसामुळे नियोजित शो रद्द करावा लागला. पुन्हा हाच शो सात डिसेंबरला घ्यायचे ठरल्याने आयोजक त्यासाठी तालुका पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याने त्रासलेल्या आयोजकाने थेट ‘एसीबी’ चे अॉफीस गाठले. यातूनच तालुका पोलिसांचे वस्त्रहरण झाले. 

जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद असल्याचा जो डांगोरा पिटला जातो, तो खरा नसल्याचे अनेक घटनांमधून पुढे आले आहे. आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांची नवीन मोडस् अॉपरेंडी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर रोड, पहिने, गिरणारे, दरी-मातोरी परिसर, पिंपळगाव, ओझर, चांदोरी, सायखेडा, विल्होळी, वाडीवऱ्हे अशा भागात हॉटेल म्हणजे अवैध परमीट रुमच झाले आहेत. अशा दारू पिण्याच्या आणि पुरवण्याच्या अड्डयांमुळे शासनाचा महसूलही बुडतो. याला पोलिसांचाच आशिर्वाद असल्याचे एक वर्षापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओतून स्पष्ट झाले होते. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागात अवैध धंदे सुरू असल्याचे कारवाईतून स्पष्ट होते.  मात्र तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी तर या सर्वांवर कडी करत लाचखोरीचा जो नमूना सादर केला तो खाकीला डाग लावणारा ठरला. सहसा पोलिस ठाण्याचा प्रभारी रंगेहाथ सापडत नाही. कारण आपल्या सुभेदारामार्फतच त्यांचे सर्व काम सुरू असते. मात्र ही घटना त्याला अपवाद ठरली. 


या घटनेला २४ तास उलटत नाही तोच शुक्रवारी शहर पोलिसांच्या सातपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास शिवाजी जाधव यांना पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या शासकीय निवासस्थानात ५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. एका गुन्ह्यात जप्त असलेली स्कार्पिओ वाहन सोडण्यासाठी जाधव यांनी थेट ८० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये घेताना ते जाळ्यात सापडले. विशेष म्हणजे हे जाधव महाशय यापूर्वीही मुरबाड (२००२) व मीरा रोड (२००७) येथे लाच घेताना सापळ्यात अडकले होते. त्यामुळे लाच घेण्यासाठी ‘सराईत’ असतानाही त्यांना थेट कार्यकारी पोस्टींग देण्याचे गौडबंगालही कायम आहेच. 

तालुका पोलिस स्टेशन काय किंवा सातपूर पोलिस स्टेशन, दोन्ही घटनातून पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बळावत चाललेल्या लाचखोरीचेच दर्शन घडले. मध्यंतरी आडगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आणि तीन कर्मचारी औरंगाबाद येथे गुन्ह्याच्या तपासासाठी गेले असता तिथे आरोपीच्या बहिणीकडून लाच घेताना पकडले गेले. वास्तविक पहाता या घटनेशी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचा काहीही संबंध नव्हता. मात्र त्यांनतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. आता सातपूरचे प्रभारी थेट रंगेहाथ पकडले गेल्याने पोलिस आयुक्त आता कोणावर कारवाई करतात, ते पहावे लागेल.


शहर पोलिस दलातही सध्या सर्वच आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. पोलिस आयुक्तांच्या अवैध धंदे कारवाई पथकाने तर सातत्याने कारवाई करत पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आरसाच दाखवला आहे. हे धंदे पोलिस ठाण्यांच्या अलिखित परवानगीशिवाय चालूच शकत नाही. त्यामुळे एकूणच पोलिसिंगविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. अवैध धंद्यांवर कारवाई होत असताना वडाळारोडवरील भारतनगर सारख्या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्याकडे होत असलेले दुर्लक्षही संशयास्पद आहे. 

Header & Footer Wide Ads
1 Comment
  1. Mushi sayed says

    Very effective news

Leave A Reply

Your email address will not be published.