Header & Footer Wide Ads

‘भारत बचाव रॅली’ द्वारे काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

नवी दिल्ली – राजधानीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’द्वारे काँग्रेसने आज केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर घणाघात करण्यात आला. 

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, ही भाजपाची मागणी राहुल गांधी यांनी साफ धुडकावली आहे. माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. 

राहुल गांधी म्हणाले, या देशाची शक्ती या देशाची अर्थव्यवस्था होती. मात्र, आता आपण दोनशे रुपये किलोने कांदा विकत घेत आहोत. मोदींनी नोटाबंदी करुन स्वतः देशाची अर्थव्यवस्था संपवल्याचा आरोपही त्यांनी केला. पी. चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी मोदींना सांगितल होते की तुम्ही जीएसटी लागू करु नका. मात्र, त्यांचे काहीही न ऐकता त्यांनी म्हटलं की रात्री १२ वाजताही मी हा जीएसटी लागू करुनच दाखवणार. मात्र, त्याचा परिणाम काय झाला तर नऊ टक्क्यांवरील जीडीपी चार टक्क्यांवर आला.  देशाच्या सर्व शत्रूंना वाटत होते की, भारताची अर्थव्यवस्था संपावी. त्यानुसार, आज आपली अर्थव्यवस्था संपली आहे मात्र हे काम त्यांनी केलेले नाही तर आपल्याच पंतप्रधानांनी केलं आहे. तरीही ते स्वतःला देशभक्त म्हणवून घेत आहेत, अशा कठोर शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. गेल्या पाच वर्षात मोदींनी अडाणीला १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ५० कंत्राटे दिली. देशाचे विमानतळ, बंदरांची काम दिली. याला आपण चोरी किंवा भ्रष्टाचार म्हणणार नाही का, असा सवाल त्यांनी  यावेळी उपस्थित केला. 

अंधेर नगरी चौपट राजा …

मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असा आहे अशी खोचक टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत घेतला. मात्र आज मी विचारते कुठे आहे तो काळा पैसा? आज देशात बेराजगारी वाढली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. छोटे व्यावसायिक प्रचंड तोटा सहन करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. 

देशात भीतीचं वातावरण आहे. यालाच म्हणतात का अच्छे दिन? असा टोलाही सोनिया गांधी यांनी लगावला. ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा मोदी सरकारने दिली होती. मात्र आज या मंचावरुन मी विचारते आहे की कुठे आहे सबका साथ सबका विकास? काही ठराविक लोकांचे खिसे भरले जात आहेत. जनतेचा, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा या सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.