Header & Footer Wide Ads

मराठी भाषेविषयी प्रत्येकाने संवेदनशील असण्याची गरज – स्वानंद बेदरकर

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त व्याख्यान संपन्न

नाशिक (प्रतिनिधी) : आज मराठी भाषेच्या वापराबाबत समाज पुरेशा प्रमाणात संवेदनशील नसून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे भाषेचा नेमका आणि अर्थवाही  वापर करणे लोक विसरत आहेत आणि त्यातून संवाद, आत्मीयता, आपलेपणा हरवून जात आहे. चिन्हांची भाषा उदयास येत असून व्यक्त होण्यासाठी अशा प्रकारची माध्यमे तोकडी ठरत आहेत. त्यासाठी मराठी भाषेच्या परंपरेकडे, साहित्याकडे, पुन्हा जाणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक स्वानंद बेदरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त स्वानंद बेदकर यांच्या ‘वैभव मराठीचे’ या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांचे सहकार्य लाभले.

श्री. बेदरकर म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी, रामदास स्वामी या थोर संतांनी लिहिलेले अभंगाच्या रूपातले अक्षरसाहित्य सर्वांच्या जीवनाला मार्गदर्शक आहे. संत नामदेवांनी‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’तून भाषेचा वापर जनप्रबोधनासाठी केला. ती शिदोरी आपले संचित आहे. शाहिरी कवितेने भाषेचा नाद आणि सौदर्य बहाल केले. कवी केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितांतून काळावर भाष्य केले. भाषिक संक्रमण, घुसळण होऊन नवी भाषा नवा विचार देणारी ठरली. लोकसाहित्यातून आलेली भाषा आणि आजची भाषा यांचा संयोग होऊन एक समृद्ध मराठी भाषा समोर आली आहे. आजच्या पिढीने, तरूणांनी सकस साहित्याचे वाचन करावे. यांच्या भाषेचा अभिमान ठेवावा व मराठी भाषा जगवण्यासाठी व जागवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. मराठी ही बोलीभाषेतून समृद्ध झालेली भाषा आहे. लहानपणापासून प्रत्येक मूल अभिव्यक्तीसाठी शब्दांशी जवळीक साधते आणि त्यातून त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. आजच्या काळात हरवलेली स्वत:ची भाषा जोपासण्याची गरज आहे. त्यासाठी अशा उपक्रमांची मदतच होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले.

स्वानंद बेदरकर यांचा परिचय विश्वास को-ऑप. बँकच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे यांनी करून दिला व सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कवी नरेश महाजन यांचा सन्मान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील यांनी तर किरण निकम यांचा सन्मान महाप्रबंधक रमेश बागुल यांनी केला. प्रशांत वाखारे यांचा सन्मान सारिका देशपांडे यांनी केला. वेदांशू पाटील यांचा सत्कार व्यवस्थापक कैलास आव्हाड यांनी केला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य रसिक उपस्थित होते.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.