Header & Footer Wide Ads

हॉर्न नॉट ओके प्लिज-कॉमन मॅन

नमस्कार. काल रात्री सहज म्हणून एक हिंदी चित्रपट बघितला. पण फारच समर्पक वाटला. अंदाजे १९७१-७२ चा. मनोज कुमारचा “शोर”. पिक्चर सुपरहिट होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. समाजात आपल्या आजूबाजूला किती ध्वनी प्रदूषण आहे, हे दाखवणारी ती फिल्म खूपच वास्तववादी होती. गाणीही सुंदर होती. “एक प्यार का नग़मा है” तर सुपर डुपर हिट. आजही ऐकायला गोड वाटतं. पण या फिल्मचा आणि आपल्या समाजाचा, आपल्या आयुष्याचा काहीच संबंध नाही, असंच आपण वागतो. हो ना?

खरंच. असंच आहे. अंदाजे ४७-४८ वर्षांपूर्वी समाजतल्या ध्वनी प्रदूषणावर या फिल्मने भाष्य केलं होतं. लोकांनी त्या फिल्मला खूप पसंत केलं, पण पुढे काय? त्यानंतर आपापल्या परीने नको असलेले आवाज कमी करण्याऐवजी, अंदाजे ७४-७५-७६ साली गाडीवर “हॉर्न ओके प्लिज” लिहायची पद्धत रुढ झाली. आता यामागे कायदा होता कि नाही ते आठवत नाही, पण जवळपास सर्वच पब्लिक ट्राम्सपोर्ट गाड्यांवर मागे ते तीन शब्द (आय लव्ह यू नाही, हॉर्न ओके प्लिज. तुम्ही लोक ना, फारच रोमॅण्टिक बरं का) तर ते तीन शब्द लिहिलेले दिसायचे.
पण असं का लिहायचं? मनोरंजन म्हणून फिल्म बघितली. बस झालं. म्हणून लगेच आपण त्यातलं चांगलं काही घ्यायचं, असं थोडंच असतं? हो, एखाद्या हिरोची हेअर स्टाईल किंवा कपडे, किंवा हिरोईनचे दागिने, हे आम्ही लगेच वापरायला घेऊ. पण हे असं? हॉर्न वाजवायचा नाही? मग रस्त्याने चालणार कसं? माझ्या एक मित्र तर रस्त्याने गाडी चालवताना अगदी एका तालात हॉर्न वाजवत असतो. त्याची संगीताची आवड त्याच्या हॉर्न वाजवण्यातून दिसते. पण काही लोक उगाचच त्याच्या या संगीतप्रेमावर आक्षेप घेत “काय रे? उगाच काय हॉर्न वाजवतो?” असं म्हणत पुढे जायचे. समाजकंटक. आज काळ बदललाय. बहुतेक सरकार मध्ये काही अनरोमॅण्टिक माणसं आली असावीत. आजकाल गाड्यांवर म्हणे “हॉर्न नॉट ओके प्लिज” अर्थात “कृपया हॉर्न वाजवू नका” असं लिहिलेलं असतं. संगीत के दुश्मन.

जाऊ द्या. “आपल्याला काय?” ती माणसं मला काहीच म्हणत नाहीत. कारण माझ्या गाडीचा हॉर्न वाजतच नाही. खराब झालाय. पण रस्त्याने चालताना मी बघतो, म्हणजे ऐकतो, काही लोक काय सुंदर हॉर्न वाजवतात. आणि हॉर्न वाजवालया लागतं तरी काय? नुसतं बटन दाबलं कि “पॅ ऽ ऽ ऽ“ असा वाजतो. आणि रस्त्याने जाताना असे वेगवेगळ्या प्रकारचे “पॅ ऽ ऽ पॅ ऽ ऽ“ म्हणजे वेगवेगळे राग एकाच वेळी ऐकल्याचा भास होतो. नाही का? पण काल संध्याकाळची गोष्ट. एका सिग्नलवर उभा होतो. रेड होता म्हणून. आमच्या खूप मागे उभा असलेला एक बाईकवाला मोठ्याने “पॅ ऽ ऽ पॅ ऽ ऽ“ करत होता. बहुतेक त्याच्या “पॅ ऽ ऽ पॅ ऽ ऽ“ करण्याने सिग्नल ग्रीन होणार होता. पण माझ्या अगदी मागे उभ्या असलेल्या एका माणसाने त्याच्या या सामाजिक कार्यावरही आक्षेप घेत त्याच्याशी थेट भांडण सुरु केलं. कसे लोक असतात, नाही का?

त्या हॉर्नवाल्याच्या प्रयत्नांना काही सेकंदांनी यश आलं, आणि मी सुखी आयुष्याचा मंत्र “आपल्याला काय?” तीन वेळा मनात म्हणत पुढे निघालो. आयुष्यात पुढे जाणं जास्त महत्वाचं. हे हॉर्नसंगीतप्रेमींना उगाचच काहीतरी बोलणं मला पटत नाही. त्या परदेशांत तर म्हणे हॉर्न अजिबातच वाजवत नाहीत म्हणे. मग रस्त्याने गाडी चालवतात तरी कसे? जाऊ द्या. आपल्याला काय? आपण कुठे परदेशात गेल्यावर गाडी चालवणार आहोत? आपण तर आपल्या शहरात पण कान बंद करुन गाडी चालवतो. तेवढाच परदेशात असल्याचा ‘फील’. आता घरात बसलोय. बाहेरुन हॉर्नचे हलके हलके स्वर अजूनही कानावर पडताहेत. पण त्या कर्णकर्कश्श आवाजाची बात ही कुछ और है. तुम्हाला असे आवाज ऐकू येत नसतील, तर एक काम करा. तुम्ही माझे किस्से, माझी मतं वाचा. न विसरता. फक्त त्यावर चारचौघात बोलू नका, इतकंच. तुम्ही जसे आहात, तसेच रहा. तब्बेतीची काळजी घ्या. आणि सहन करत रहा. चेहऱ्यावर स्माईल ठेवून. उद्या पुन्हा भेटू. बाय.

लेखक – एक कॉमन मॅन

Header & Footer Wide Ads
1 Comment
  1. Shibani S says

    तुम्हाला भले हॉर्न च्या आवाजात संगीत ऐकू येत असेल पण अकारण हॉर्न वाजवणार्यांना ध्वनिप्रदूषण.कायद्याअंतर्गत दंड ठोठावला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.