Header & Footer Wide Ads

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

 नाशिक – (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर विजयी झाला आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली आहे. हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेशवर ३-२ ने मात केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. हर्षवर्धन हा नाशिकचा पैलवान आहे. त्याचे वडील शाळेत क्लर्क आहेत. त्याने सुरुवातीला नाशिकच्या बलकवडे आखाड्यात आणि नंतर पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे घेतले. काका पवारांचा शिष्य म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याला मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभवही आहे. आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.

पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. विशेष  म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहेत. त्यामुळे हा विजय माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही महत्वाचा होता. 
शैलेश आणि हर्षवर्धन हे एकाच तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. अति बचावात्मक कुस्ती खेळल्यामुळे पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला. दुसऱ्या डावातही दोन्ही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. दुसरा डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावत बरोबरी साधली. मात्र शेवटच्या १-० सेकंदात हर्षवर्धनने निर्णयाक डाव टाकत महत्वाच्या दोन गुणांची कमाई करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.