Header & Footer Wide Ads

‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखऊन प्रतिभाताईंनी महिला व देशापुढे आदर्श ठेवला-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार

नागपूर: आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या सुखोईतून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय नागपूर केंद्राच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खा. शरद पवार, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, माजी मुख्यमंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार सर्वश्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, दीपक केसरकर व संयोजक गिरीश गांधी उपस्थित होते.

कितीही मतभिन्नता असली तरी राज्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भावनेतून प्रतिभाताईंचे समर्थन केल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले. मला अनुभवसंपन्न व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभला. प्रतिभाताईंचा सत्कार करण्याची मुख्यमंत्री म्हणून आपणास संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्यमंत्री नसतो तरीही या कार्यक्रमाला आलो असतो, कारण प्रतिभाताईंशी माझ्या आजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. मध्यंतरी भेटी झाल्या नाहीत तरी ते नाते घट्टपणे जपले गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिभाताई राष्ट्रपती असतांना त्यांनी स्वतः उपवासाच्या महाराष्ट्रीयन पदार्थांची रेसिपी सांगून उपवासाचे पदार्थ बनवून घेतले होते आणि राष्ट्रपती भवनात ते आग्रहाने खाऊ  घातले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताईंना मिळाला असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले. बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेल्या दोन व्यक्ती प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी मुख्यमंत्री असताना प्रतिभाताईंचा मृदू स्वभाव मला कधीच जाणवला नाही. त्यांनी अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडली अशी आठवण श्री. पवार यांनी सांगितली. देशातील सर्व राज्याच्या कृषी मंत्र्यांची बैठक घेऊन शेतीसमोरील अडचणी आणि उपायांची टिपणे तयार करून प्रधानमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठवणाऱ्या त्या देशातील पहिल्याच राष्ट्रपती होत्या. अतिशय वेगवान अशा सुखोई विमानात सैन्याचा पोशाख घालून प्रवास करणाऱ्याही प्रतिभाताई पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरल्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, लेकीबाळीचे कौतुक आणि सत्कार करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि ही संस्कृती बाळासाहेबांनी दाखविली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यग्र असतानाही या कार्यक्रमाला वेळ काढून आले, हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत. भारताचा व्यापार आणि उद्योग वाढविण्यासाठी राष्ट्रपती असताना परदेश दौऱ्यावर पहिल्यांदा व्यापारविषयक शिष्टमंडळ नेण्याचे काम केले. त्यामुळे भारताचा व्यापार आणि उद्योगवृध्दीस बळकटी मिळाली. 

 भारताची आंतरिक ताकद मोठी असून महात्मा गांधींच्या नैतिक तत्वावर आणि मानवी मूल्यांवर आधारित आहे. महात्मा गांधीं, पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद  यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले व त्याग केला. या देशाच्या पायाचे हे आधारस्तंभ आहेत. या आधारस्तंभांना विसरून कसे चालेल, असा प्रश्न त्यांनी केला. राष्ट्रभक्ती आणि विद्वत्ता असणाऱ्या डॉ.आंबेडकरांशिवाय संविधान लिहिण्याचे काम कोणी  करू शकणार नाही, असा विश्वास महात्मा गांधींना होता, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती असताना त्या पदाचा मान आणि गौरव वाढविण्याचे काम करता आले, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलांचा प्रमुख असतो. म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी वयाच्या 74 व्या वर्षी सैन्याचा पोशाख चढवून ‘सुखोइ’त प्रवास करण्याचे धाडस करता आले, याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक आमदार अनिल देशमुख यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार कृपाल तुमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर आभार गिरीश गांधी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खासदार, आमदार व नागरिक उपस्थित होते.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.