Header & Footer Wide Ads

साहेब, रुबाब विसरले -कॉमन मॅन

नमस्कार. माफ करा पण मी आजही राजकारणावरच बोलणार आहे. काय करणार? निदान महाराष्टात तरी या लोकांनी दुस-या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला वाव ठेवला नाही. आज हा तर उद्या तो, रोज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एक वेगळा दावेदार समोर येतो. नेमकं कोण होणार. हे काही कळत नाही. बरं, एखादा मुख्यमंत्री झाला, तरी तो किती काळ टिकेल, याचीही खात्री देता येत नाही. कारण शपथविधी झाल्यानंतर सुध्दा ८० तासात पदच्युत झालेले मुख्यमंत्री आत्ताच आपण बघितले.

असो. आता कुणीऔरी एक मुख्यमंत्री होऊ द्या रे बाबा. बस, इतकंच काय ते म्हणणं आहे. ते झाल्याशिवाय आमचे नवनिर्वाचित आमदार त्यांच्या घरच्यांनाही भेटू शकत नाहीयेत. मग आमच्यासारख्या कधी ओळखही नसलेल्या मतदारांची काय कथा? मला कधी कधी आश्चर्य वाटतं कि आपण मतदार अनोळखी माणसाला एक स्माईलही लवकर देत नाही, मग कोणत्याही अनोळखी माणसाला आपलं (तथाकथित बहुमोल) मत कसं काय देतो? कमाल आहे ना? काय करु? माझ्या डोकूयात असे कमालीचे विचार नेहमीच येत असतात.

पूर्वी एकदा आमच्या शेजारच्या काकांचा मुलगा परदेशी जाणार होता. त्याच्या एका कामासाठी त्याला तिकडून बोलावणं आलं होतं. पण त्याला सगळा खर्च स्वतः करायचा होता. ती परदेशातली कंपनी त्याला ते पैसे नंतर देणार होते. खर्चाची रक्कम काही लाखांची होती, म्हणून काकांनी इकडेतिकडे मदत मागायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी प्रयत्न करुनही सगळी रक्कम जमा होत नव्हती.

मग कुणीतरी त्या काकांना सल्ला दिला कि तुम्ही आपल्या आमदारांना भेटा. काकांना खूपच आनंद झाला, कारण आमदार त्यांच्या कुणाचातरी विद्यार्थी होता म्हणे. काकांना खात्री होती कि त्यांचा मुलगा आमदाराच्या मदतीने परदेशी जाऊन मोहिम फत्ते करणारच. आणि काका आमदाराच्या घरी पोहोचले.

तिथे पोहोचल्यावर काकांना खूप सारे साक्षात्कार झाले. खरंच माणसाने एकदा तरी आमदार खासदारांना भेटायला जावंच. खूप ज्ञान मिळतं. काकांचंच पहा ना. तिथे गेल्यावर त्यांना समजलं कि आमदार नाही म्हणायचं, साहेब म्हणायचं. त्या साहेबांचं ‘घर’ नाही म्हणायचं, बंगला म्हणायचं. आणि तुम्ही ओळखीचे जरी असलात, तरी तिथे जाताना खुप वेळ काढुन जायचं. याचा अर्थ साहेब तुमच्याशी खूप सगळ्या गप्पा मारतील, असं नाही. तुम्हाला साहेबांपर्यंत पोहोचायलाच (प्रायोरिटीनुसार) किती वेळ लागेल, याची काही गॅरंटी नाही. काका तिथे किती वेळ होते माहित नाही, पण आमदार साहेब काकांची (दोन-चार लाखांची) मदत करु शकले नाहीत. कारण त्यावेळी ते काही कोटींच्या जमिनीचा सौदा करण्यात व्यस्त होते.

काकांचं काम झालं नाही. त्यांनी एका खाजगी सावकाराकडून, भरपूर व्याजावर कर्ज घेउन मुलाला परदेशी पाठवलं. नंतर कर्जही कसंबसं फेडलं. पण आज त्यांचा मुलगा ‘सेटल्ड’ आहे. असो. काका निराश होऊन परतल्यामुळे आमदार कसा दिसतो, सॉरी साहेब कसे दिसतात ते मी विचारलंच नाही. या गोष्टीला काही वर्षे झाली. काकांनी साहेबांचा बघितलेला रुबाब ऐकुन मात्र त्यावेळी हेवा वाटला होता. खरंच साहेब लोक इतक्या रुबाबात रहात असतील का? कारण काल-परवाच टिव्हीवर कोणत्यातरी न्यूज चॅनलवर असे खूप सगळे ‘साहेब’ एकाच गाडीत कोंबून भरलेले दिसले. सगळ्यांचे चेहरे भांबावलेले. कुणालाही पुढच्या क्षणी काय होईल, याची खात्री दिसत नव्हती. ते रुबाब कि काय म्हणतात, तो त्यांच्या दहा-पंधरा पिढ्यात कुणी बघितला नसेल, असे ते दिसत होते. मला वाटलं “साहेब रुबाब विसरले असतील” नाहीतर इतके घाबरलेले, भांबावलेले, भ्रमिष्ट, इ.इ. ते कधीच दिसले नाहीत. (मी पोस्टरवर बघितलं त्याबद्दल बोलतोय)

जाऊ द्या. “आपल्याला काय?” असं म्हणत मी चॅनल बदललं, आणि एक साऊथचा डब्ड पिक्चर बघितला. तुम्ही पण असंच करा. आपापलं मनोरंजन आपणच शोधा आणि मजेत रहा. नाही तर माझे विचार, माझी मतं रोज वाचा. पण बाहेर कुणासोबतही डिस्कस करु नका. जसे आहात तसेच रहा. सगळं सहन करा, हसतमुखाने. बाकी उद्या भेटू. बाय.
लेखक – कॉमन मॅन 

Header & Footer Wide Ads
1 Comment
  1. Sid says

    ???

Leave A Reply

Your email address will not be published.