Header & Footer Wide Ads

सावळा गोंधळ-कॉमन मॅन

नमस्कार. काल सकाळी जाग आली तीच मुळी ब्रेकिंग न्यूजने. पण हि ब्रेकिंग न्यूज अशी होती कि जिने माझा मतदान करणं, आपला उमेदवार निवडून देणं, लोकशाही, वगैरे वगैरे गोष्टींवरचा विश्वासच ब्रेक केला. किंवा त्याला ब्रेक लावला म्हटलं तरी चालेल. तसं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट संपली आणि मुख्यमंत्री ठरला, हे चांगलंच झालं, पण राष्ट्रपतींनी माझ्या आयुष्यावर काही परिणाम केल्याचं मला गेल्या तेरा दिवसात जाणवलं नाही. राष्ट्रपती राजवटीतही मी हजारो लोकांना रोज ट्रॅफिक हवालदारासमोर नियम मोडताना बघितलं. हे एक उदाहरण होतं. अशा अनेक गोष्टी आहेत.

पण माझा मुद्दा असा कि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण? हा जो मुद्दा गेला एक महिना ऐरणीवर धरुन ठेवला गेला होता, त्यामागे नेमकं काय चाललं होतं, हे मला कधीच कळलं नाही. (तसा मी तितका बावळट नाही. फक्त माझी बायको मला तसं समजते.) सत्ताधारी पक्षाने स्वबळावर निवडणुक लढवली नाही. त्यांच्याशी युति केलेल्या पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या सल्ल्याने / मदतीने / समन्वयाने निवडणुक लढवली आणि दुसरा आघाडीचा पक्ष झाले. आणखी दोन पक्षांच्या युतिने जवळपास १०० जागा जिंकल्या. निकाल लागले, आणि “मुख्यमंत्री कोण?” हा मुद्दा चर्चेत आला. (दुसरीकडे माझ्या घराचा महाराष्ट्र झाला. घरातही तीच चर्चा, आणि तशीच बाचाबाची.)


सत्ताधारी पक्ष, ज्याला यावेळीही सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या, तो पुरेश्या जागांअभावी सत्ता स्थापन करु शकत नव्हता. त्याच्याशी युति करणाऱ्या पक्षाने “मुख्यमंत्री आमचाच” असं म्हणत एका राजकारणात अगदीच नवख्या असलेल्या एका वारसाचं नाव सुचवलं. ते सत्ताधारी पक्षानं ते नाकारलं. लगेच त्या युति केलेल्या पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या नावाने गरळ ओकायला सुरुवात केली. (हे म्हणजे द्राक्ष आंबट आहेत, असं वाटायला लागलं) सत्ताधारी पक्ष हिंदी सिनेमाच्या हिरोच्या आईसारखा दृढ, स्थितप्रज्ञ राहिला. युति केलेला पक्ष आक्रमक पावित्रा घेत दुसरीकडे जुळवाजुळव करु लागला. एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं अफेअर असल्याचं समजल्यावर तिचा / त्याचा बाप चवताळून लगेच लग्न करुन द्यायचा चंग बांधतो ना? तसं वाटायला लागलं.


इकडे सत्ताधारी पक्ष “मुख्यमंत्री आमचाच” यावर ठाम, तर दुसरीकडे युति केलेला पक्ष दुसऱ्या युतीसोबत हातमिळवणी करायला सज्ज. त्यातही त्यांचं “मुख्यमंत्री आमचाच” हे बिरुद कायम. दुसऱ्या युतीमधले एक ज्येष्ठ नेते म्हणजे राजकारणातले धुरंधर. त्यांनी ते त्यांचा सपोर्ट देताहेत कि नाही, हे सस्पेन्स अगदी गुप्त पिक्चरसारखं टिकवून ठेवलं. अगदी आजपर्यंत.
पण आज सकाळी ‘कहानी में ट्विस्ट’ आला आणि इतके दिवस सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरत असलेल्या सत्ताधारी पक्षाने अचानक ज्येष्ठ नेत्यांच्या पुतण्याच्या सहाय्याने / मदतीने / सपोर्टने सरकार स्थापन करण्याची तयारीही केली आणि “मुख्यमंत्री त्यांचाच” झाला. सगलीकडे याच गोष्टीची चर्चा सुरु असताना ज्येष्ठ नेत्यांनी (पुतण्यासोबत गेलेल्या उमेदवारांसकट सर्वांना) मिटींगसाठी बोलावलं. पुन्हा सगळे ज्येष्ठ नेत्याकडे हजर. (ठाकूर ने बुलाया है म्हटल्यावर बिगार घर सोडून जातो तसे) पुतण्या पुन्हा एकटा पडला, (हिरोईन सोडून गेलेल्या हिरोसारखा) आणि दुसऱ्या युतीने मुसंडी मारण्याचा आणखी एक प्रयत्न केला. आता “पुन्हा आलेल्या” मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायचंय.


पण हे काका-पुतणे, दिल्लीतल्या हायकमांड , युतीतून वेगळे झालेले आक्रमक पक्षवाले (आणि इतर) मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करु देतील? कि पुन्हा रस्सीखेच (किंवा खरं तर आमदार खेच) सुरु होऊन पारडं हलतंच राहिल? (फिल्ममधल्या कोर्टात ‘इन्साफ की देवी’ चा तराजु हलतो ना? तसं) काहीच कळत नाहिये. मी तर एक साधा माणूस आहे. “मला राजकारणात इंटरेस्ट नाही” असं कितीही म्हटलं, तरीही राजकारण हा माझ्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनून गेला एक महिना मला सतावतंय. मेण्टली हॅरॅस करतंय. (बहुतेक काही मोठे नेते हि गोष्ट गेले काही दिवस अनुभवत असतील)


पण मला सांगा… सत्तेसाठी वाट्टेल तसं वागणं, आमदार फोडणं, आपल्याच पक्षाच्या आमदारांना एखाद्या ठिकाणी बंदिस्त करुन ठेवणं, दुसऱ्या पक्षासोबत आपल्याच पक्षातली सुद्धा माणसं फितुर करणं, निवडणुकांच्या आधी जे-जे बोललो होतो, ते सगळं विसरुन फक्त सत्तेसाठी वाट्टेल तसं अर्वाच्च बोलणं, जनतेशी खोटं बोलणं तर कॉमन झालंय, पण आपल्या मित्रपक्षाशीही खोटं बोलणं… एक ना अनेक कितीतरी प्रामाणिकपणाला बालंट लावणारे प्रसंग गेल्या एक महिन्यात ऐकायला, पहायला मिळाले.


मी याचसाठी मतदान केलं होतं का? (मला कधी कधी असे फालतू प्रश्न पडतात)
खूप विचार केला, पण उत्तर मिळत नाहीये. (काय करणार? याचं उत्तर मिळवण्याची कुवत माझ्या बुद्धीची नसावी) उद्या सकाळी काय होणार? हे आज रात्रीही सांगता येणार नाही. (निवडणुकांच्या आधी आरडाओरडा करणाऱ्या न्य़ुज चॅनलवाल्यांनाही सांगता येणार नाही) अगदी तुम्ही हे वाचत असतानाही काहीतरी ब्रेकिंग न्यूज घडत असेल. ती आपल्याला आता नाही कळणार. ती कळेल – उद्या / परवा / पक्षश्रेष्ठींना वाटेल तेव्हा. तोपर्यंत आपण आपापसात चर्चा करत बसायचं, आणि त्यातली एखादी गोष्ट झाली कि म्हणायचं, “मी तर आधीच बोललो होतो.” आपण, कॉमन मॅन, इतकंच करु शकतो. सत्तेसाठी चाललेला घाणेरडा खेळ आपल्याला कधीच कळणार नाही. कळू दिला जाणार नाही.


मला हि आपण निवडून दिलेली माणसं अगदी रिषभ पंतच्या बॅटिंग इतकी बेभरवशाची वाटू लागली आहेत. एका अर्थी मला तर हा सत्तेचा क्रूर खेळ वाटतोय. पण या खेळात कोणत्या वेळी कोण सरस आहे, हेही सांगता येणार नाही. आणि अखेरीस कोण जिंकेल, हेही. हा असा विचार करुन डोक्याला ताप करुन घेण्यापेक्षा शेवटी “आपल्याला काय?” हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा, आणि शांतपणे झोपी जायचं. तरीही झोप येत नसेल तर एक काम करा. तुम्ही माझे किस्से, माझी मतं वाचा. न विसरता. फक्त त्यावर चारचौघात बोलू नका, इतकंच. तुम्ही जसे आहात, तसेच रहा. तब्बेतीची काळजी घ्या. आणि सहन करत रहा. चेहऱ्यावर स्माईल ठेवून. उद्या पुन्हा भेटू. बाय.
लेखक – एक कॉमन मॅन

Header & Footer Wide Ads
1 Comment
  1. निलेश says

    प्रत्येक मनातली गोष्ट आहे ही

Leave A Reply

Your email address will not be published.