Header & Footer Wide Ads

स्वबोध ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत लिहून जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे स्वबोध ज्ञानेश्वरी होय. सुमारे एक लाख शब्दांचे हे लेखन ब्रह्मलीन परमपूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या आशीर्वादाने पद्माकर रघुनाथ देशपांडे यांनी केले. पुस्तकरूपाने त्याचे प्रकाशन २००२ च्या नोव्हेंबर महिन्यात विजयादशमीच्या दिवशी परमपूज्य काकांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘जंनस्थान’ या वेब साईट वरुन २८६ भागात दररोज एक या प्रमाणे ते प्रकाशित झाले. त्याचा समारोप आज होत आहे. या लेखनामुळे जशी कृतकृत्यतेची भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे तशी प्रस्तुत लेखकास देखील व्यक्त करावीशी वाटते आणि सर्व वाचकांना देखील तशी वाटली असेल अशी खात्री वाटते. प्रकाशक जनस्थानचे सर्वेसर्वा श्री अभय ओझरकर व सर्व वाचकांना धन्यवाद आणि सर्वांप्रती शुभकामना!! हरी ओम तत्सत 


                                                                                                                           

अध्याय १८ : मोक्षसंन्यासयोग

विश्वात्मक देवाकडे प्रार्थना!

आता हे विश्वात्मक देवा! या वाग्यज्ञामुळे संतुष्ट होऊन मला प्रसाददान द्यावे. दुष्टाची वक्रदृष्टी नष्ट व्हावी, त्यांना सत्कर्मामध्ये गोडी निर्माण व्हावी व ती वाढावी. जगातील सर्व जीवांची एकमेकांशी मैत्री व्हावी, दुःखीतांचे दुःख दूर व्हावे, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात सर्व व्यवहार चालावेत, सर्व जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. भग्वद्भक्तांच्या समुदायाने सर्वांवर मांगल्याचा वर्षाव करीत प्रत्येक जीवाला भेट द्यावी. चिंतामणिचे सजीव गाव, अमृताचा सागर,चालते-बोलते कल्पतरू किंवा डाग नसलेले चंद्र, ताप नसलेले सूर्य असे सज्जन सर्वांचे सोयरे व्हावेत. तिन्ही लोकांतील सर्वांनी सुखी होऊन परमेश्वराचे अखंडित भजन करावे. हा ग्रंथ हेच जीवन झाले आहे, अशांना ईह-पर लोकांतील भोगांवर विजय मिळावा. 

यावर श्रीविश्वेश्वर गुरु म्हणाले, “हा दानप्रसाद होईल !” आणि या वरामुळे ज्ञानदेव सुखी झाले. रामदेवराय राजा असलेल्या महाराष्ट्र प्रांतात, दक्षिण गोदावरीच्या काठी, श्रीमोहनीराजाचे देवस्थान असलेल्या पुण्यक्षेत्री, नेवासा येथे नाथ परंपरेतील श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांनी गीतेवर मराठी साज चढविला. महाभारताच्या गावी, भीष्मपर्वात श्रीकृष्णार्जुन संवादात जे सांगण्यात आले आहे, त्या उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसांचे सरोवर असलेल्या श्री गीतेचा कळस असलेला हा अठरावा अध्याय पूर्ण केला, असे श्री निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात. या ग्रंथाच्या पुण्याची संपत्ती उत्तरोत्तर सर्वांपर्यंत पोहोचवून सर्व संपूर्ण सुखी होतील. शके बाराशे बारामध्ये ज्ञानेश्वरांनी ही टीका केली. तिचे लेखन सच्चिदानंद बाबा यांनी केले आहे.(भाग-२८६ )

हरी ओम तत्सत 

निरुपण -पद्माकर देशपांडे,नाशिक 

Header & Footer Wide Ads
2 Comments
  1. Shubhada Gokhale says

    धन्यवाद !!!

  2. Mrs Shubhada Tushar Gokhale says

    धन्यवाद !!!

Leave A Reply

Your email address will not be published.