Header & Footer Wide Ads

नृत्यांगणच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

नाशिक-मुंबईच्या स्वर साधना समितीतर्फे दरवर्षी अखिल भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन, वादन स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. यावर्षी दि. ११ जानेवारी रोजी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडल्या. शास्त्रीय क्षेत्रात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धा गेल्या ५५ वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहेत.  शास्त्रीय नृत्यात कथक, भरतनाट्यम, ओडिसी अशा विविध विभागात या स्पर्धा होतात. यावर्षी कथकनृत्य विभागात खुल्या गटात नाशिकच्या नृत्यांगण कथकनृत्य संस्थेच्या विद्यार्थिनी प्रचिती भावे हिने द्वितीय क्रमांक तर निहारिका देशपांडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. नाशिकसाठी व नृत्यांगण कथकनृत्य संस्थेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

या दोघीही नाशिकच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या शिष्या आहेत. गेली १२ वर्ष त्या गुरू कीर्ती भवाळकर यांच्याकडे कथकनृत्याचे शिक्षण घेत आहेत. प्रचिती भावे हिने शिववंदना, धमार ताल व अभिनयात होरी प्रस्तुत केली. तर निहारिका देशपांडे हिने गणेशवंदना, झपताल, अभिनयात पं. बिंदादान महाराजांची ‘शाम छबी’ हे भजन सादर केले. दोघींच्या सादरीकरणाला परीक्षक व प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली.  स्पर्धेत दोघींना गायन व हार्मोनियमची साथ पुष्कराज भागवत, तबल्याची साथ वैष्णवी भडकमकर आणि पढंत गुरू कीर्ती भवाळकर यांनी केली. स्पर्धेचे परीक्षण पुण्याच्या अमला शेखर आणि मुंबईच्या नूतन पटवर्धन यांनी केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १९ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. शास्त्रीय क्षेत्रातील महत्त्वाच्या नृत्यस्पर्धेत नाशिकच्या एकाच गुरूच्या दोन शिष्यांना या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे,  ही नाशिकसाठी उल्लेखनीय बाब आहे.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.