Header & Footer Wide Ads

गोष्ट एका फसलेल्या लग्नाची…

बनावट निकाहनामा…बोगस धर्मांतर  अन् एक कोटीला गंडा 
नाशिक –
(प्रतिनिधी) परदेशात नोकरीस असलेल्या उच्चशिक्षीत युवकास जाळ्यात ओढून विवाह करत तसेच धर्मांतराची बनावट कागदपत्रे बनवून पत्नी व तिच्या नातेवाईकांनी तब्बल एक कोटीला गंडा घातल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

अमोल जगदीश पाटोळे (वय ३५, रा. सार्थक बंगला, जयाबाई कॉलनी, प्रधाननगर, नाशिकरोड) असे त्या पीडित युवकाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी सोबिया अमोल पाटोळे, हमिदा एजाज पिरजादे, एहतेशाम एजाज पिरजादे, मोहम्मद मोबीन साबीर, नदिम मोहम्मद साबीर (सर्व रा. बागवानपुरा), एजाज शफी पिरजादे (रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ४०६, ४१८, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४६९, १२०(ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अमोल पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २००८ मध्ये त्यांना इंग्लंडमधील क्वेस्ट या आय.टी. कंपनीत नोकरी लागली. जुनमध्ये वर्क व्हिसा दाखल करण्यासाठी ते नाशिकला आले. मित्रांना भेटण्यासाठी कॉलेजरोड परिसरात ते नेहमीच जायचे.  तेथे मित्रांबरोबर आलेली सोबिया हिच्याशी ओळख झाली. सोबियाने अमोलचा मोबाईल नंबर घेत एसएमएस करत ओळख वाढवली. सप्टेंबर २००८ मध्ये अमोल इंग्लंडला गेल्यानंतरही सोबिया एसएमएस करत संपर्कात होतीच. जागतिक आर्थिक मंदीमुळे नोकरी गेल्याने अमोलला नाशिकला परत यावे लागले. त्यामुळे ती पुन्हा संपर्क साधू लागली. अॉक्टोबर २००९ मध्ये पुर्वीच्याच कंपनीत नोकरी मिळाल्याने अमोल पुन्हा इंग्लंडला गेला. अमोल तिथे असताना सोबिया फोनद्वारे भावनिक संवाद साधत तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाही, असे सांगून लग्नाची मागणी घातली. डिसेंबर २००९ मध्ये अमोल नाशिकला आल्यावर पिरजादे यांच्या घरी गेला. तेव्हा सोबियाची आई हमिदा आणि भाऊ एहतेशाम यांनी भिती दाखवत लग्नासाठी दबाव टाकला. त्यामुळे २९ डिसेंबर २००९ रोजी नाशिकच्या विवाह नोंदणी कार्यालयात नेऊन विवाह नोंदणी फॉर्मवर तसेच १०० रुपयांच्या कोऱ्या स्टॕम्पवर अमोलच्या सह्या घेतल्या. ३१ डिसेंबरला अमोल इंग्लंडला गेल्यानंतर सोबियाने दबाव टाकून नोंदणी अर्जाप्रमाणे विवाह करावा लागेल असा तगादा लावला. त्यामुळे अमोल भारतात परतला व आठ मार्च २००९ रोजी विवाह नोंदणी कार्यालयात दोघांचा विवाह झाला. 

विवाहानंतर मे २००९ मध्ये सोबिया इंग्लंडला गेली. सुरुवातीला दोन आठवडे व्यवस्थित राहिल्यानंतर ती वाद घालू लागली. तसेच मद्यप्राशनही करू लागली. दारु पिल्यानंतर आई व भावाला आर्थिक मदत करण्याचा आग्रह धरला. अमोलने त्यास नकार दिल्यानंतर दम देऊ लागली. त्यामुळे कॉलेजरोडवरील सिटी बँकेतील अकाउंटमधून पैसे काढण्याचे अधिकार  एहतेशाम याला दिले. त्याद्वारे त्याने चार ते पाच लाख रुपये काढले. नंतर सोबियाने नाशिकला स्वतंत्र घर हवे असा तगादा लावला. आई हमिदाच्या नावावर घर खरेदी करू नंतर आपल्या नावावर करू असे तिने सांगितले. त्यानुसार १२ लाख २३ हजार रुपये अजीज इनामदार यांना देऊन इंदिरानगरमधील अमिदीप अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ११ हमिदा पिरजादे यांच्या नावे खरेदी केला. त्यानंतरही आई व भावाला आर्थिक मदत करण्याचा तगादा सोबियाने सुरूच ठेवला. त्यामुळे वेळोवेळी एहतेशाम यास ४७ लाख ९७ हजार तर हमिदा यांना ४० लाख रुपये देण्यात आले. तसेच सोबिया हिच्या आर.बी.एल बँक खात्यात १२ लाख रुपये भरण्यात आले. एप्रिल २०१४ मध्ये अमोल नाशिकला आल्यानंतर सोबियासह इंदिरानगरमधील फ्लॅटमध्ये राहू लागले. तिथेही सोबिया नेहमी दारु पिवून आरडाओरड करायची त्यामुळे शेजारच्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. 

अॉक्टोबर २०१६ मध्ये अमोल जर्मनीहून परतल्यानंतर सोबिया इंदिरानगरमधील फ्लॅटमध्ये नव्हती. फ्लॅटमधील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. जर्मनीहून येताना आणलेले ३८०० युरो, पासपोर्ट, इतर कागदपत्रे सोबियाच्या अल्टो कारमध्ये ठेवले होते. ते देखील ती घेऊन गेली. याबाबत विचारणा केली असता तिने या वस्तु पाहीजे असतील तर आई हमिदाच्या घरी बोलावले. मात्र तिथे जाऊनही काहीच न मिळाल्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तसेच इंदिरानगर पोलिस ठाण्यात सोबियाविरुद्ध चोरीचा गुन्हा (३२५/२०१६) नोंदवण्यात आला. गरज भासू लागल्याने सोबिया, हमिदा तसेच एहतेशाम यांच्याकडे पैशांची मागणी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. अमोल यांनी दिवाणी न्यायालयात हमिदा व एहतेशाम पिरजादे यांच्याविरुद्ध केस दाखल केल्यानंतर सोबिया हिच्या नावावर ॲक्सीस बँकेत खाते उघडून त्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले. साबियाने ते पैसे काढून घेत अपहार केला. 

दिवाणी न्यायालयात हमिदा व एहतेशाम यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या केस करता अमोल हे न्यायालयात हजर झाले असता अमोल जगदीश पाटोळे याने धर्मांतर करून त्याचे नाव अमाल अली मलिक असे असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा कोऱ्या  स्टॕम्प पेपर घेतलेल्या सह्यांचा दुरुपयोग करून धर्मांतरची खोटी कागदपत्रे बनवल्याचे अमोल यांच्या लक्षात आले. तसेच खोटा निकाहनामाही बनवण्यात आला. त्यावरही अमोल यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाबाबत अमोल पाटोळे यांनी नाशिकरोड न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने सीआरपीसी १५६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.