Header & Footer Wide Ads

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकरी मजबूत होणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 पुणे – आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर राज्यकर्त्यांनी आम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकरी मजबूत होणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळे केले जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केले आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले आहेत. ठाकरेंनी यावेळी बोलताना लहानपणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा याची आठवण सांगितली. “आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. ऊसाची गुऱ्हाळं नाक्यावर असायची. ऊनात गार ऊसाचा रस पिऊन बरे वाटायचे. पण गुऱ्हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसऱ्या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचे लक्ष नसायचे. आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर राज्यकर्त्यांनी आम्ही याकडे लक्ष दिले नाही तर अशा कार्यक्रमाला काही अर्थ नाही, असे सांगत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करताना शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा अस्तित्वात आणल्याशिवाय राहणारच नाही असे आश्वासन दिले. दोन लाखांच्या वरील टप्प्यासाठी आपण विचार करत असून शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून हे सरकार काम करेल असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही विचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात उघडण्यासाठी पुढील मंत्री मंडळ बैठकीत घेऊ अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आगामी काळात या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याचे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार, भाजपा नेते विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे वितरण तसेच साखर संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.